Monday, February 09, 2026

हाताची कमाल

मी: “आज रविवार, मोकळा दिवसं आहे”. असं जाहीर करताच मला लक्षात आलं - “हात दाखवून अवलक्षण म्हणजे नक्की काय”. 

ती : “अरे वा, बराच पसारा झाला आहे, तु आवरून टाक, पण भांडी घासून झाल्यावर”. असं म्हणून ती हात धूऊन माझ्या मागेच लागली. 

मी : “अगं, सकाळपासून माझी पाठ दुखते आहे. थोडा आराम करायला हवा आहे”. असं म्हणून मी हात वर केले. 

ती : “असं का?  थांब मी तुला लाटण्यानेच पाठ चोळून देते”. 

तिचे अवसान बघून माझ्या लगेच लक्षात आले कि तिच्या हातावर तुरी देऊन काम टाळणे शक्यच नाही, माझ्या आळसाने तिच्यासमोर हात टेकले, आणी मी हात धऊन भांडी घासू लागलो. काम करता करता, माझी पाठदुखी देखील हात चोळीत, फारसी तसदी न देताच निघून गेली. 

तिचा हात धरल्यापासून लक्षात आलं - वामांगी रखुमाई याचा अर्थ असा आहे की, पांडूरंग हा हा रखुमाईचा जणू उजवा हात आहे, पर्यायाने पांडूरंगही निवांत बसू शकत नाही, विटेवरही त्यासी उभेच रहावे लागते.

No comments: