खरं तर ना सश्याने शर्यंत लावली ना कासवाने.. त्यांना दोघांनातर बोलताही येत नव्हत. ससा आपला त्यांचा त्याचाटूणूक टूणूक उड्या मारायचा, कधी गवत खायचा आणी मिळालचं तर एखादं गाजर 🥕 खायचा. फार पुर्वी तरगाजरही नव्हती .. फक्त गवतच खायचा.. तुम्हाला वाटत असेल कि गवत नाही, गवती चहा पित असेल तर तेहीनाही तो फक्त गवतचं खायचा ..
तसंच कासव 🐢 पण आपल्याच कोशात निवांत पहुडलेले असायचे .. कधी जमिनीत, कधी पाण्यात, शेकडोवर्षांच आयुष्य असल्याने त्याला तसं कशाचीही घाई नव्हती.
सश्याला माहीती होतं कि तो काही कासव नाही शेकडो वर्ष जगायला, पण त्यालाही फक्त गवतचं लागायचं आणीतेही मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने तोही निवांतच होता.
ऐके दिवशी तिकडून एक लाकूडतोड्या जात होता .. तो भयंकर निष्काळजी होता, घाबरटहि होता आणी त्याला पोहताही येत नव्हतं. खर सांगायचं तर अगदीच कामचुकार!
त्यांच्या वेंधळेपणामुळे लाकूड तोडता तोडता, म्हणजे झाडाची फांदी तोडता तोडता त्याच्या हातातून कुर्हाड विहीरीत पडली.. तेव्हा काही लाकूडतोड्याची गोष्ट वैगरे नव्हती .. त्यामुळे कुर्हाड परत मिळेल वैगरे अशी वायफळ अपेक्षांचं काय ईच्छा सुध्दा नव्हती.
मग घरी जाता जाता त्या लाकूडतोड्याच्या डोक्याला खाज सुटली, कारण पाण्याच्या टंचाईमुळे तो आंघोळ करत नसे, पोहता येत नसल्याने , नदी असूनही पाणी टंचाई आहे असं त्याला वाटत होतं. पण त्या काळात मनोवैद्यक नसल्याने त्याला कोणी सांगितलंच नाही की तो मुळात स्वभावतःच आळशी असल्याने त्याला पाणी टंचाई जाणवते आहे, आणी तो पाण्याच्या टंचाईच कारण देऊन आंघोळ टाळत असल्याने डोक्याला खाज सुटते आहे.
पण काय असेल ते असेल, डोक्याला खाज सुटल्याने खाजवणं क्रमप्राप्त होतं .. पण त्या काळा पर्यंत छपाई यंत्र नव्हती ना जहाजंही नव्हती ना ईंटरनेट किंवा what’s app हि नव्हतं. त्यामुळे संवाद साधण्यची साधनं (communication medium) नसल्याने, दळणवळण नसल्याने जगात दुसऱ्या कोपऱ्यात अल्लाउद्दिन रहातो, आणी लागेल तसा दिवा खाजवून, नव्हे घासून बाहेर येण्यार्या जीनी कडून काम करवून घेतो ह्या बाबतीत तो अनभिज्ञ होता.
त्यामुळे त्याने खाज सुटली म्हणून टोकं खाजवलं, त्यातून जीनी वैगरे येण्याची शक्यताच नव्हती, पण आज हजारो वर्षांनतंर जे आपल्याला वैचारीक स्तरावर जे जाणवलं त्याची त्याला अनुभूती आली.
त्याने डोकं खाजवलं आणी त्याच्या डोक्यातच एक कल्पना आलीं.. ती घरी बसून फक्त झोपा काढणारी कल्पना नव्हे तर डोक्यातली खरी खुरी कल्पक कल्पना..
तो घरी पोहचला, आणी बायकोने पाहिलं की त्याच्याकडे लाकडं तर नाहीच, त्यातून ह्याने कुर्हाडपण विहीरीत पाडली. (हो त्या काळातही बायको होतीच)
कुर्हाड नाही, त्यातून विहीरीत पाडली म्हटल्यावर बायको ने त्याला बेदम मारला.. पार सुजवून टाकला. डोकं सुजलं .. पण त्याला परत खाज सुटली.. अजून एक कल्पना..
बघता बघता त्याला कल्पना सुचत गेल्या.. त्याने आजूबाजूच्या लोकांना गोळा केलं.. सगळे विचारू लागले, अरे तू ईतका सुजला कसा.. आता बायकोने बेदम मारलं आहे हे कसं सांगणार, मग तो म्हणाला, अरे माझी सूज सोडा… मी जंगलातून येता येता काय पाहिलं माहीती आहे का? ते म्हणाले “नाही…!” तो म्हणाला .. “थांबा सागतो” … पण सांगणार काय?
आणी डोक्यात खाज, खाजवता खाजवता त्याला त्याला आठवलं .. बागडणारा ससा , डुलत डुलत चालणारं कासव. मग त्यांने सगळ्यांना सश्या आणी कासवाच्या शर्यतीची गोष्ट सांगितली ..सगळ्यांना आवडली, पण एक उपटसुंभ म्हटला , ससा जिंकला .. त्यात काय विशेष.. त्यालाही ते पटलं.
दुसऱ्या दिवशी सगळे पुन्हा त्याच्या घरी जमा झाले, सुज कमी झाली का ते बघायला… पण सुज कमी तर सोडा वाढली होती, लोकांना बोलवून वायफळ वेळ घालवला, आणी बायकोच्या कॅाफित जायफळ घालायचा विसरला म्हणून बायकोने त्याला पुन्हा बेदम मारला होता.
सगळ्यांनी पुन्हा विचारलं.. सुज कशी आहे .. तो म्हटला .. सुज सोडा, काय सगळी गम्मत सांगितलीच नाही .. मग त्याने पुन्हा सगळी गोष्ट सांगितली पण या वेळेस कासव जिंकले होतं.
कासव जिंकल्याची गोष्ट सगळ्या पंचक्रोशीत पसरली.. लाकुडतोड्याचा कुर्हाड पाण्यात पडल्याने व्यवसाय ठप्प होता, मग काय त्याने गोष्टी सांगायला सुरुवात केली.. एकाने विचारलं .. अरे तू लाकूडतोड्या आहेस ना? तुझ्या कुर्हाडीचं काय झालं? तो म्हटला .. अरे त्याची पण गम्मत आहे.. मग त्याने कुर्हाडीची गोष्टं सांगितली. असं करता करता तो प्रसिद्ध झाला, पण खाज काही जात नव्हती मग त्याने जादूच्या दिव्याची गोष्ट सांगितली. शतकानी शतकं अश्या गोष्टी प्रचलित झाल्या .. त्याने बघता बघता विलास करण्यासाठी मोठ्ठा विलाच बांधला त्याकाळच्या मुंबई ४.० मध्ये.
जशी जशी दळणवळणाची साधनं निर्माण झाली तशी माणसं ईकडून तिकडे जाऊ लागली.. त्या लाकूडतोड्याची वशांवळ जरी कामचुकार आणी आळशी असली तरी त्यांनाही खाज होती .. देशी विदेशी या गोष्टी देशीविदेशी मारता मारता जगभर प्रसरु लागल्या. कालांतराने माहीतीजालाचे निर्माणहि याचं मंडळींनी बनवले, कामसु पण गाफिल जनतेचे लक्षवेधून सश्या आणी कासवाचा इतिहास समजविण्सासाठी.. त्यांनी अश्या कथा what’s app द्वारे प्रसारित करण्यास सुरुवात केली
तर अश्या त्या लाकूडतोड्याच्या बायकोच नाव योगायोगाने कल्पना होतं .. तर त्याचं नाव काय असेल?
विलास… आणी त्यांच्या मुंबई ४.० च्या घराचं नाव कल्पनाविलास. #कल्पनाविलास.
No comments:
Post a Comment